⁠ 
शनिवार, जून 15, 2024

केळी विकास महामंडळाबाबत एकनाथराव खडसे विधानपरिषदेत म्हणाले….

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ जुलै २०२३। केळी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी विधानपरिषदे मागणी केली आहे. तसेच अधिवेशनात याबाबत घोषणा करण्याची व महामंडळ कार्यान्वित करण्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कडे मागणी केली आहे.

नुसती केळी विकास महामंडळ स्थापनेची घोषणा करून भागणार नाही, तर लगेच महामंडळ कार्यान्वित करावे महामंडळाला पुरेसा निधी, भागभांडवल, कर्मचारी वर्ग, कार्यालयासाठी इमारत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये केली. केळी विकास महामंडळा कडून जळगाव,धुळे, नंदुरबार व इतर जिल्हयातील केळी उत्पादकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत, असे देखील ते म्हणाले आहे.

यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले, “जळगाव जिल्हा हा केळी उत्पादक जिल्हा असुन, केळी विकास महामंडळ स्थापन व्हावे हि केळी उत्पादक शेतकऱ्यांची जुनी मागणी आहे. आपण कृषी मंत्री असताना याबाबत कार्यवाही केली होती. परंतु राजीनामा द्यावा लागल्याने हा विषय तेव्हा मागे पडला. केळी विकास महामंडळ हे जळगाव जिल्ह्यासह नंदूरबार धुळे व इतर केळी उत्पादक जिल्हयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

या महामंडळाची स्थापना होऊन यातून केळी उत्पादक क्षेत्राचा विकास व्हावा केळी पिकावर संशोधन व्हावे, टिशू कल्चर रोपांचा विकास व्हावा शेतकऱ्यांना कमी दरात रोपे उपलब्ध व्हावेत, केळीचे मार्केटिंग व्हावे मार्केटिंगमधून केळी निर्यातीला चालना मिळावी, गोडावून, शितकरण गृहाची निर्मिती व्हावी ते शेतकऱ्यांना कमी दराने उपलब्ध व्हावे, अशा सुविधा केळी विकास महामंडळाच्या माध्यमातून निर्माण व्हाव्यात. यासाठी केळी विकास महामंडळाची स्थापना व्हावी म्हणून सतत पाठपुरावा केला.

कृषिमंत्री असताना यासाठी प्रयत्न केले त्यासाठी केळी उत्पादक शेतकरी संबंधित अधिकारी यांच्या दोन बैठका घेतल्या परंतु राजिनामा द्यावा लागल्याने हा विषय तेव्हा प्रलंबित राहिला तेव्हापासून प्रलंबितच आहे. 2014 ला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लवकरात लवकर केळी विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. आता 2023 आले तरी स्थापना झाली नाही प्रत्येक वेळी सत्ताधारी लवकरात लवकर महामंडळ स्थापन होईल, अशी घोषणा करतात परंतु लवकरात लवकर हा कालावधी संपतच नाही म्हणून लवकरात लवकर एक विशिष्ट कालमर्यादा ठरवून केळी विकास महामंडळाची स्थापना करावी. सरकारला केळी विकास महामंडळाची स्थापना करायची असेल तर वर्षानुवर्षे वाट बघायला न लावता कृषीमंत्री यांनी आजच मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा करून आजच सभागृहात केळी विकास महामंडळ स्थापनेची घोषणा करावी व महामंडळ कार्यान्वित करावे अशी आग्रही मागणी एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये केली.

केळी विकास महामंडळा कडून जळगाव,धुळे, नंदुरबार व इतर जिल्हयातील केळी उत्पादकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.