⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगावातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला होता एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज। चेतन वाणी। महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९२ मध्ये भाऊ रंगारी यांनी केल्याची तर १८९४ मध्ये लोकमान्य टिळक यांनी केल्याचे सांगितले जाते. जळगाव जिल्हा आज स्वतंत्र असला तरी स्वातंत्र्य पूर्व काळात जळगाव जिल्हा पूर्व खान्देश म्हणून सर्वांना परिचित होता. स्वातंत्र्य पूर्व काळात जळगावातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव १९२४ मध्ये सुरु झाल्याचे बोलले जात असले तरी शहरात १९४६ मध्ये नवीपेठेतील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर ‘विकास मंडळ’ स्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यात आला होता.

महाराष्ट्रात शिवकाळापासून घरोघरी गणरायाची स्थापना केली जात आहे. गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन जनमानसाचे प्रबोधन करण्याचे कार्य थोर समाजसेवकांनी केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव हा स्वतंत्र जिल्हा नसून पूर्व खान्देशचा एक भाग होता. पूर्व खान्देशचे जळगाव हे मुख्यालय होते.

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर जळगावात १९२४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची बोलले जाते. जळगाव जिल्ह्यात १९४६ मध्ये नवीपेठेत विकास मंडळ नावाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. जळगाव शहर सुरुवातीला शास्त्री टॉवर, शहर पोलीस ठाण्याच्या पलीकडच्या परिसरातच मुख्य जळगाव वसलेले होते. जुन्या जळगावातच सर्व वस्ती होती. नवीपेठ परिसर तेव्हा गावाच्या बाहेर आणि नव्याने वसणारा भाग होता.

नवीपेठेतील वसंतराव नारळे यांच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर विकास मंडळाची डॉ.अविनाश आचार्य, बापूसाहेब कुळकर्णी, गजानन जोशी, राजबापू शिंदे या पाच भाविकांनी स्थापना केली होती. जळगावातील गणेशोस्तवाला खऱ्या अर्थाने सार्वजनिक रूपच मिळाले नाही तर त्या काळात गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. विकास मंडळाच्या रूपाने नंतर अनेकांनी प्रेरणा घेत शहरात आणि गावोगावी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. शहराचा मुख्य भाग असलेल्या जुने जळगावात अनेक मंडळ नावारूपास येऊ लागली.

जळगाव जिल्ह्याचे प्रमुख स्थान असल्याने आजूबाजूच्या खेड्यातील आणि इतर लोक देखावे, आरास पाहण्यासाठी जळगावात येत होते. शहरात सुरु झालेला सार्वजनिक गणेशोत्सव विकास मंडळाने आणखी विस्तारित करीत पारंपरिकता जोपासत आपली संस्कृती मूल्ये कशी जपली जातील यासाठी नेहमी प्रयत्न केले. डॉ.अविनाश आचार्य, वसंतराव नारळे, बापूसाहेब कुळकर्णी, गजानन जोशी, राजबापू शिंदे या तरुणांनी तेव्हा पुढाकार घेतला नसता तर जळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला आणखी वर्षे लोटली.