⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | अगोदर घोटला पत्नीचा गळा, नंतर स्वतःही केली आत्महत्या

अगोदर घोटला पत्नीचा गळा, नंतर स्वतःही केली आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या सावखेडा शिवारात धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. रात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतादेखील पॅन्टने गळफास घेत आत्महत्या केल्याच्या प्रकाराने जिल्हा हादरला आहे. सावखेडा शिवारातील माजी सरपंचाच्या शेतात पळसाच्या झाडाला पँटने गळफास घेत आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे.

सावखेडा बु. शिवारात सतिष धनसिंग परदेशी वय-३८ हा पत्नी गायत्री सतिष परदेशी (पत्नी) वय-३२, ६ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाच्या मुलीसह राहत होता. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे संपूर्ण कुटुंब झोपल्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सतिष परदेशी याने गाढ झोपेत असलेल्या पत्नी गायत्री परदेशी हिला दोन्ही हाताने गळा आवळून ठार केले. नंतर आरडाओरड करून घराबाहेर पळत असतानांच शेजारच्या घरी राहत असलेल्या त्याचा लहान भाऊ संदिप परदेशी यांच्या सदरची बाब लक्षात आल्यानंतर त्याने सतिषचा पाठलाग करून त्यास पकडून, तू एवढ्या रात्री कुठे जात आहेस व आरडाओरड का करीत आहेस? अशी विचारणा केली असता सतिषने सांगितले की, तू मला काय अडवतो आहेस, मी माझी पत्नी गायत्री हिचा गळा दाबून खून केला आहे. असे सांगताच सतिष त्याच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता संदिप ने घरात जाऊन बघितले असता गायत्री मृत अवस्थेत तर दोघे मुले झोपलेल्या अवस्थेत आढळून आले.

गावाबाहेर शेतात घेतला गळफास

पत्नीचा खून केल्यानंतर सतिष परदेशी याने गावाबाहेर पळत जाऊन माजी सरपंच गोकुळसिंग नथ्थुसिंग परदेशी यांच्या शेतात गेल्यानंतर पळसाच्या झाडावर चढत अंगात असलेल्या स्वेटर व नाईट पँटचे दोन तुकडे करून गळ्याभोवती आवळून गळफास घेतला. सकाळी घडलेल्या प्रकारची वार्ता गावभर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सतिष याचा शोध सुरू झाला. दरम्यान गावातीलच संजय धना सोनवणे हे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात जात असतांना त्यांना पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सतिष धनसिंग परदेशी याचा मृतदेह आढळून आल्याने त्याने गावात पळत जाऊन घटनेची माहिती दिली.

नेमके कारण गुलदस्त्यात

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पत्नीस ठार करून स्वतः गळफास घेणारा इसम काही प्रमाणात वेडसर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, सहायक फौजदार विजय माळी, हवालदार दिपकसिंग पाटील, संदिप राजपूत, वाहनचालक दिपक अहिरे यांनी पंचनामा केला. मयत पती व पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे यांनी केले.

वडिलांचे पाच दिवसांपूर्वीच निधन

रविवारी दि.२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने सतिष धनसिंग परदेशी व संदिप धनसिंग परदेशी यांचे वडील धनसिंग चिंधा परदेशी यांचे निधन झाले होते. शनिवारी दि.३० रोजी सावखेडा येथून अस्थी नाशिक येथे नेण्यात येणार होत्या. दरम्यान, दुसऱ्या दिवशी अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम असल्याने सतिष परदेशी व त्याचे कुटुंब दुसऱ्या दिवशी लवकर उठून तयारी करण्यासाठी रोजच्या वेळेपेक्षा लवकर झोपले होते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.