जळगाव स्थानकावर अमृतसर एक्सप्रेसच्या ब्रेक डिस्कला आग ; प्रवाशांमध्ये एकच खळबळ

जुलै 1, 2026 4:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव रेल्वे स्थानकावर आज बुधवारी सकाळी मुंबईहून अमृतसरकडे जाणाऱ्या अमृतसर एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीच्या ब्रेक डिस्कला आग लागल्याची घटना घडली. यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग तात्काळ आटोक्यात आली असून संभाव्य मोठा अनर्थ टळला.

amaritsar expres fire

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर एक्स्प्रेस सकाळी ७ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल होत असताना तांत्रिक बिघाड झाला. रेल्वे रुळाला लागलेली एक चावी (की) उडून थेट ‘डीव्ही’ला लागली. यामुळे गाडीचे एअर प्रेशर अचानक रिलीज झाले आणि सामान ब्रेक व जनरेटर कार बोगीचे ब्रेक अचानक दाबले गेले. धावत्या गाडीचे ब्रेक अचानक लागल्यामुळे ब्रेक डिस्कमध्ये तीव्र घर्षण निर्माण झाले आणि तिथे आग लागली.

आग लागल्याबरोबर जनरेटर बोगीच्या खालून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले. हे पाहून प्लॅटफॉर्मवर आणि गाडीतील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी भयभीत झाले आणि सुरक्षिततेसाठी पळू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे स्थानकावरील आणि गाडीतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जनरेटर बोगीतील दोन फायर एक्स्टिंग्विशर (अग्निशामक यंत्रे) वापरून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

याच दरम्यान, भुसावळ येथील आपली ड्युटी संपवून इगतपुरी मेमू ट्रेनने घरी जाण्यासाठी निघालेले तांत्रिक सहाय्यक देवेंद्र गुरव हे जळगाव स्थानकावर उतरले होते. त्यांनी हा प्रकार पाहताच क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत एअर प्रेशर नियंत्रित केले. त्यांच्या या तात्काळ मदतीमुळे रेल्वेची यंत्रणा पुन्हा सुरळीत होण्यास मोठी मदत झाली.

सव्वा तासानंतर ट्रेन रवाना
आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर रेल्वेच्या तांत्रिक पथकाद्वारे बोगीची सखोल तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर, सकाळी सुमारे ८.१५ वाजता अमृतसर एक्सप्रेस भुसावळच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now