⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन आयोजकांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे दि. २१ रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, हे आयोजन आयोजकांना चांगलेच महागात पडले असून कीर्तन आयोजकांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सायगाव ता. चाळीसगाव येथे दि. 21 रोजी ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक जागी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याची माहिती असून देखील कीर्तन सोहळ्याचे आयोजन आयोजकांनी केले व वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून जनसमुदाय जमवला तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेशाचे उल्लंघन केले आणि लोकांची जीवितास धोका असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरविण्याची घातक कृती केली म्हणून पो.ना. सिद्धांत शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयोजकांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये नाराजी
दरम्यान, बाजारपेठांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी होणारी भरगच्च गर्दी याकडे पोलिसांचे लक्ष जात नाही का? असा नाराजीचा सूर सायगाव येथील रहिवाशांकडून उमटत आहे.