हृदयद्रावक! एरंडोल तालुक्यातील पिता-पुत्र नर्मदा नदीत बुडाले; पित्याचा मृत्यू, मुलगा बेपत्ता

ऑगस्ट 29, 2026 1:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एरंडोल तालुक्यातील खडके येथील एका कुटुंबावर नर्मदा नदीत झालेल्या जलदुर्घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जबलपूर परिसरात नर्मदा नदीकाठी असलेल्या आश्रमात गेलेल्या पिता-पुत्रासोबत ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत वडिलांचा मृतदेह शोधण्यात आला असून, ११ वर्षीय मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. गणेश शांताराम पाटील (वय ३६) व लकी गणेश पाटील (वय ११) अशी दोघांची नावे आहे.

khadke

खडके येथील संबंधित परिवारासह गावातील आणखी दोन-तीन परिवार १९ ऑगस्ट रोजी जबलपूर परिसरातील नर्मदा नदीकाठी असलेल्या सुनील महाराज उर्फ सोनू महाराज यांच्या आश्रमात गेले होते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी या आश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मोफत अन्नदानाची सेवा सुरू आहे. त्यामुळे खडकेसह परिसरातील नागरिक तेथे गेले होते.

पायाची माती धुण्यासाठी गेला अन् वाहून गेला
नर्मदा नदीत सर्वांनी अंघोळ केल्यानंतर लकी पाण्याबाहेर आला होता. काही वेळाने त्याच्या पायाला माती लागल्याचे त्याच्या लक्षात आले. पायाला लागलेली माती धुण्यासाठी तो पुन्हा नदीकडे गेला. पाय धुण्यासाठी तो प्रवाहाच्या दिशेने जात असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. नदीचा प्रवाह वेगवान असल्याने तो वाहून गेला.

मुलगा वाहून जात असल्याचे लक्षात येताच वडील गणेश पाटील यांनी त्याला वाचवण्यासाठी कोणताही विचार न करता नदीत उडी घेतली. मात्र, नर्मदेच्या वेगवान प्रवाहामुळे तेही पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान गणेश पाटील यांचा मृतदेह सापडला, मात्र लकीचा अद्याप शोध लागलेला नाही. मुलाचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेमुळे खडके गावावर शोककळा पसरली असून, पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now