जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ । यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात , बनावट बियाणे, खतांपासून शेतकऱ्यांनी सावध व्हावे, पक्के बिल घेवूनच तसेच अधिकृत केंद्रातूनच शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करावे, नकली वाणांपासून सावध होवून फसवुणकीपासून दूर रहावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
रब्बी हंगामात तसेच गेल्या वर्षीचे सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे पीकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामात अवकाळी पावसाने हाती आलेला घास शेतकऱ्यांकडून हिरावला आहे. तर दुसरीकडे कापसालाही पुरेसा भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पाऊस, पिकाला भाव न मिळणे, यासह इतर सर्व संकटावर मात करत बळीराजा पुन्हा तयारीला लागला आहे. गेल्या काळातील नुकसानभरुन काढण्यासाठी शेतकरी सज्ज झाले असून मशागतीच्या कामांना वेग आला आहे. अनेकदा शेतकरी पेरणीची घाई करतात, मात्र पेरणीनंतर पाऊस लांबणीवर पडल्याने दुबार पेरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते, त्यामुळे पेरणी योग्य आणि पुरेसा पाऊस झाल्यावरच जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी काही दिवस शिल्लक असून शेतकरी शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहे. कोणते बियाणे घ्यावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा असून विविध कंपन्यांच्या प्रचार गाडया देखील गावोगावी फिरत आहेत. मागील वर्षी अंकुर सिडसच्या स्वदेशी ५ प्रचलित वाणाच्या नावाखाली बोगस बियाण्याची विक्री होवून शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.
गुजरात राज्यातील आनंद व वडोदरा याठिकाणी कापसाच्या वाणाचे बिजोत्पादन घेतले जाते, मात्र तेथील शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली आहे. यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेली स्वदेशी ५ बियाणे मिळणार नाही. त्यामुळे स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी. अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करू नये. तसेच अशा कृषि निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करावी, माहिती द्यावी. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ सुरु झाला असून यामध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांच्या क्षेत्रीयस्तरावरील अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच कृषि निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. याबाबत येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८९८३८३९४६८, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार [email protected] वर सुद्धा ईमेल द्वारे पाठवता येणार आहे.