मसाकाचा बंद गाळप हंगाम सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह
जळगाव लाईव्ह न्यूज । फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंदावस्थेत असल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहेत. आता हा कारखाना त्वरित सुरू करावा, अशी मागणी ६४ शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे केली.
उत्तर महाराष्ट्रातील कधीही खंड न पडता सलग ४५ वर्षे ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून मधुकर सहकारी साखर कारखान्याचा लौकिक होता. पण, आर्थिक अडचणींमुळे हा पाच वर्षांपासून बंदावस्थेत आहे. मध्यंतरी थकीत कर्जामुळे जिल्हा बँकेने या कारखान्ऱ्याची विक्री केली. यानंतर २०२३-२४ या हंगामात कारखाना सुरू होईल, असे सांगण्यात आले. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
पण, अचानक माशी शिंकली. कारखान्याच्या गाळप हंगामासाठी लागणारा उस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने गतवर्षी साखर कारखाना सुरू झाला नाही. पण, २०२३-२४ मध्ये उस लागवड करून शेतकऱ्यांनी सहकार्य केले होते. त्यामुळे मे. इंडिया बायो ॲण्ड ॲग्रो पॅसिफिक प्रा.लि. कंपनीने किमान आता २०२४-२५ मध्ये गाळप हंगाम सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, कारखान्याचे अवसायक, तहसीलदारांना निवेदनातून केली. देविदास पाटील, अनिल बजगुजर, प्रमोद भिरूड, डॉ. राजेंद्र झांबरे, मधुकर पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.