जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. पीक हाताशी आले तर भाव मिळत नाही. सर्वच नशिबाचा खेळ असताना काही हाती आलेच तर ते चोरटे पळवतात असे होऊ लागले आहे. पाचोरा तालुक्यातील नांद्रा शिवारातून चोरट्यांनी शेतकऱ्याचा तब्बल १८ क्विंटल कापूस चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील शेतकरी सुभाष त्र्यंबक पाटील यांचे जुने पहान नांद्रा रस्त्याला लागून शिवारात गोडावून आहे. दि.१५ च्या रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत गोडावूनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गोडावून मधून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीचा १८ क्विंटल कापूस चोरून नेला.

दि.१६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडलेला प्रकार समोर आला. शेतकरी सुभाष त्र्यंबक पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार दिलीप वाघमोडे करीत आहेत.








