⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे.

पाचोरा तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील रहिवाशी अशोक एकनाथ लांडगे वय-४० यांच्याकडे दोन एकर जमीन असून सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आज दि.१३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

मयत अशोक लांडगे यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण विकास बँकेचे ७७ हजार रुपये कर्ज तसेच पत्नीच्या नावे बचत गटाचे ९० हजार रुपये कर्ज असल्याचे समजते. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचीही परिसरात चर्चा सुरू आहे. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी केले. अशोक लांडगे यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शून्य क्रमांकाने पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार धीरज मंडलिक हे करीत आहे.