जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पिके चांगल्या प्रकारे बहरले आहेत. मात्र अनेक ठिकाणी मका, सोयाबीन, कापूस व इतर पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. या अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. मात्र बाजारात काही दिवसांपासून बोगस कीटकनाशक मिळत असल्याच्या चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहेत. अशावेळी यांच्यापासून शेतकऱ्यांनी दूर राहणे गरजेचे आहे.
बोगस कीटकनाशकांचे परिणाम काय?
बोगस कीटकनाशकांच्या फवारणीमुळे बहरलेले पीक जळून जाण्याची भीती असते.
कित्येकदा बोगस कीटकनाशकांची फवारणी करूनही कोणताही परिणाम होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. फवारणीमुळे फायदा होत असेल तर शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आणि यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कित्येकदा पिकांची वाढ देखील थांबते.
याबाबत जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, बोगस बियाणे व बोगस कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर आमच्यातर्फे कारवाई नेहमी सुरूच असते. शेतकरी बांधवांना कधीही कोणत्याही कीटकनाशक किंवा इतर कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल तर त्या बदल्यात एक पक्क बिल घ्यावं. त्याशिवाय कोणताही व्यवहार करू नये. पक्क बिल जर एखादा व्यक्ती देत नसेल याचा अर्थ तो बनावटी कीटकनाशक विकत आहे.