जळगाव लाईव्ह न्यूज । ६ संप्टेंबर २०२४ । एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीन लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा घेताना जळगावच्या दोघांसह रावेरच्या एकाला पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून ३ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या तिघांना गुरुवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडीत सुनावली. या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशात जुळल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
त्यादृष्टीने पोलिस मास्टर माइंडच्या मागावर आहेत. नकली नोटा प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी अटक केलेल्या सय्यद मुशाहीद अली मुमताज अली (वय ३८, रा.उस्मानिया पार्क, जळगाव) याच्याविरुद्ध वरणगाव पोलिसांत ईसी अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. तर अब्दुल हमीद कागल (वय ५७, रा. रसलपूर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) याच्याविरूद्ध बनावट नोटा चलनात आणल्याचे तब्बल ५ गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी, जिल्हा पेठ (जळगाव) व मलकापूर येथे प्रत्येकी एक, तर जळगाव शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या संशयिताचे नाव नदीम खान रहीम खान (वय ३५, रा.सुभाष चौक, शनिपेठ, जळगाव) असे आहे
रावेरचा अब्दुल कागल हा जळगावचे सय्यद मुशाहीद आणि नदीम खान यांच्याकडून बनावट चलनी नोटा विकत घेण्यासाठी भुसावळात आला होता. पण, पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, ही कारवाई करणारे बाजारपेठचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पथकातील योगेश माळी, प्रशांत परदेशी, नीलेश चौधरी आदींचा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी जळगावात रिवॉर्ड देवून गौरव केला.