⁠ 
शनिवार, मे 4, 2024

वीज चोरीच्या गुन्ह्यात कारखानदाराला सक्तमजुरीची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। वीज चोरीच्या गुन्ह्यात टोणगाव (ता. भडगाव) येथील कारखानदाराला जिल्‍हा न्यायालयाने १ वर्ष सक्त मजुरीसह १० हजारांची शिक्षा ठोठावली आहे. २०१८ मध्ये वीजचोरी प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात रऊफ अली अहमदअली याच्याविरुद्ध विजमंडळाने गुन्हा दाखल केला होता. त्यावर मंगळवारी (ता. ८) निकाल झाला.

रऊफ अली अहमद अली (रा. गट. नं. १४/१) यांचा टोणगाव औद्योगिक परिसरात कारखाना आहे. या कंपनीत अचानक विद्युत विभागाच्या व्हिजीलन्स विभागाने छापा टाकून विज मिटर तपासणी केली असता, विद्युत मिटरच्या बॉडीवर असलेले सर्व बाजुंचे सिल तोडलेले आढळून आले. तसेच, सुरक्षा स्टिकरही क्रॅक होते. कुणीतरी हे विजमिटर हाताळल्याचे स्पष्ट जाणवत होते.

अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा आणि वापर यासाठी विशीष्ठ यंत्राद्वारे या कंपनीतील मिटरची तपासणी केली. त्यात, कंपनीतील यंत्र सामुग्रीकडून वापर होणारी विज आणि त्या तुलनेत मिटरचे रिडींग यात गडबड असल्याचे आढळले. वापरकर्त्या कारखानदाराने रिमोट कंट्रोल अथवा जामरद्वारे मिटर रिडींग थांबवल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. संशयीत कारखानदाराने २४ महिन्यांत १ लाख ११ हजार ७८९ इतक्या विद्युत भार (युनिटची) चोरी करुन विद्युत कंपनीचे १५ लाख ३३ हजार ६९० रुपयांचे आर्थीक नुकसान केले होते.

या प्रकरणी विज अभियंत्यांच्या तक्रारीवरुन भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याचा तपास पुर्ण होवुन दोषारोप पत्र न्यायालयात सादर झाल्यावर न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु झाले. सरकारी अभियोक्ता वैशाली महाजन यांनी ६ महत्वपुर्ण साक्षीदारांच्या साक्ष न्यायालयात नोंदविल्या.

प्राप्त पुरावे, दस्तऐवज, तज्ञांचा अहवाल आणि तपासाधिकाऱ्यांची साक्ष याच्या आधारावर संशयीत रऊफ अली अहमद अली याच्याविरुद्ध दोषारोप सिद्ध झाले. न्यायालयाने भारतीय विद्युत कायदा कलम- १३५ प्रमाणे १ वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे संशयीत आरोपीला १५ लाख ३३ हजार ६९० रुपये ३ महिन्याच्या आत विज कंपनीला भरणा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.