जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता असून १०-११ जून रोजी जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल व यंदा कमी दिवसात जास्त पाऊस होईल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
राज्याच्या हवामानाचा अभ्यास करीत डॉ.साबळे यांनी विभागवार पावसाचा अंदाज यापूर्वीच वर्तवला आहे. मात्र यंदा जळगाव जिल्ह्यात पाऊस कसा असेल व त्यानुसार यंदा कोणत्या पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे, याबाबत डॉ.साबळे म्हणाले, जळगाव व धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस होईल. मार्च ते मे महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होता व तापमान ही २ ते ३ अंशाने कमी असल्याने त्याचा मान्सूनवर परिणाम होईल. यंदाच्या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी दिवसात जास्त पावसाची दाट शक्यता आहे, असे साबळे यांनी सांगितले.
लॉकडाऊनचे नुकसान आता भरून निघणार
लॉकडाऊन काळात प्रत्येक क्षेत्राला फटका बसला. त्याला कृषी क्षेत्रदेखील अपवाद नाही. त्यामुळे आगामी काळात दमदार पावसामुळे बळीराजाचे नुकसान भरून निघेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. लॉकडाऊन काळातील नुकसीनीची भर काढण्यासाठी शेतकरीदेखील जोमाने हंगामाच्या तयारीला लागले आहेत. शेतीशिवारात सध्या कामांची लगबग सुरू आहे.
या तारखांना पावसाची शक्यता
जून : ९, १०, १४ १५, १९, २१, २२, २४, २७
जुलै : १०, ११, १५, १६, १९, २०, २१, २४, २८, २९
आॅगष्ट : २, ४, ५, ७, ८, ९, १२, १४, १५, १६, १८, २०, २२, २४
सप्टेंबर : ६, ७, ८, १२, १४, १५, १८, १९, २१, २७, २८
ऑक्टोबर : १, ३, ४, ५, ६, ९, १०, १४, १८, २०, २४
गेल्यावर्षी वादळी सुरुवात
२०२० मध्ये जून महिन्यात निसर्गवादळाने जळगाव जिल्ह्यात जोरदार तडाखा दिला होता. ३ जून रोजी चोपडा, भुसावळ, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. ४ जून रोजी चोपडा, यावल तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. चोपडा तालुक्यात नद्यांना पूर आला होता. गेल्या वर्षी मृग नक्षत्राचे वाहन म्हैस होते. लवकर पाऊस झाल्याने लवकर पेरण्या झाल्या होत्या.