जळगाव लाईव्ह न्यूज | चिन्मय जगताप | भारतीय जनता पक्षा विरुद्ध सगळे विरोधी पक्ष एकवटले तरी देखील जळगाव जिल्हा परिषदेमध्ये भाजपचीच सत्ता येईल असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आ.गिरीश महाजन यांनी जळगाव लाईव्ह शी बोलताना केला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला खाली खेचण्यासाठी शिवसेना महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जळगाव जिल्हा परिषदेमध्ये राबवायला उत्सुक आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आम्हाला शिवसेनेतर्फे कोणताही प्रस्ताव आलेला नाही अस सांगण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात या कारणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या प्रशासनाला संपूर्ण महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे. आता भारतीय जनता पक्ष हाच जळगाव जिल्ह्यातील पर्याय आहे. यासाठी संपूर्ण जळगाव जिल्हातील मतदार जिल्हा परिषदेच्या निवडणुकी वेळी भारतीय जनता पक्षाला साथ देईल. असा आमचा विश्वास आहे असे जळगाव लाईव्ह शी बोलताना महाजन यांनी सांगितले.
एकीकडे भारतीय जनता पक्षाकडे मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी संपूर्ण बहुमत नसतानाही काँग्रेसचे दोन निवडून आलेले सदस्य फोडत भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकावला होता. मात्र त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे एकनाथ खडसे नावाचे मातब्बर नेते होते. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाची जी गत झाली तीच गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी देखील होईल? की आमदार गिरीश महाजन म्हणाल्या प्रमाणे भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषदेवर पूर्ण पुन्हा सत्ता येईल ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.