⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कामाच्या ठिकाणी महिलांचे छळ रोखण्यासाठी समिती स्थापन करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । महिला कर्मचारी यांचा कामाच्या ठिकाणी छळ होत असल्यास कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत Sexual Harassment electronic Box (SHEBOX) या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर महिलेने आपली तक्रार नोंद करावी. तसेच कार्यालय प्रमुखाने अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करुन त्याचा अहवाल विहित नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांना 30 एप्रिल, 2021 पर्यंत सादर करावा. याबाबत कार्यवाही न केल्यास कलम 26 क प्रमाणे 50 हजार रुपये इतका दंड संबंधित कार्यालय प्रमुखांवर आकारण्यात येईल. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा यांची शासनाने स्थापन केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पूर्ण किंवा अशंत: प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष निधी शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी किवा नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना तसेच कोणतेही खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, एन्टरप्राईझेस अशासकीय संघटना, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठादार, विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठाधारक रुग्णालय सुश्रृषालये, क्रिडासंस्था, प्रेक्षागृहे, क्रिडासंकुले इ. नियमात नमुद केलेल्या शासकीय व खाजगी  क्षेत्रातील कार्यालयाच्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छाळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 कलम 4 (1) अन्वये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावणे तसेच अधिनियमातील कलम 6 (1) अन्वये जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती गठीत करणे कायद्याने बंधनकारक आहे.

या अधिनियमानुसार ज्या कार्यालयात 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत अशा कार्यालयात अतंर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. आणि ज्या कार्यालयात 10 हून कमी कर्मचारी आहेत. उदा. असंघटीत क्षेत्र, शासकीय, खाजगी, लहान अस्थापना किंवा जेथे नियुक्ती प्राधिकाऱ्याविरुध्द लैगिक छळाची तक्रार आहे. अशा कार्यालयातील लैगिक छळाची तक्रार जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीकडे करावी.

अधिक माहितीसाठी Jalgaon.nic.in व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केद्राजवळ, जळगाव दूरध्वनी क्र. 0257-2228828 अथवा [email protected] या ईमेल वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.