जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२२ । एरंडोलात सध्या बस स्थानकालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बस स्थानकाच्या गेट पासून ते कासोदारस्त्या पर्यंतच्या नियोजित सर्व्हिस रोडचे काम का होत नाही ? त्यामागे गौड बंगाल काय ? सदर रस्ता सर्व्हिस रस्त्या होण्याबाबत काही एक चिन्ह दिसत नाही ?रस्ता सर्व्हिस होणार की नाही ? असे विविध प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत असून याप्रकरणी एरंडोल करांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
एरंडोल बस स्थानकाच्या गेट पासून ते कासोदा रस्त्यापर्यंतच्या संपूर्ण नऊ मीटरचा सर्व्हिस रस्ता करण्यामध्ये अतिक्रमणांच्या अडथळा असल्याचे बोलले जाते, एरंडोल नगरपालिका प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून सर्व्हिस रोडला अडथळे ठरणारे नऊ मीटरची संपूर्ण अतिक्रमणे काढण्याची कारवाई त्वरित करावी, अशी सुजाण नागरिकांची मागणी आहे. या प्रश्नासाठी काही सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व काही जाणकार नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत जर सर्व्हिस रोड झाला नाही तर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाने बस स्थानकावर जावे का तसेच बस स्थानकावरून गावात जाताना सुद्धा राष्ट्रीय महामार्गाने जावे लागणार का असे संतप्त सवाल विचारले जात आहे.
मुजावर वाडा कासोदा दरवाजा गाढवे गल्ली गढी परिसर पांडव वाडा परिसर मारवाडी गल्ली अमळनेर दरवाजा या भागातील नागरिकांना बस स्थानकावर येण्यासाठी व बाहेरगावाहून घरी परतण्यासाठी तसेच बाहेरगावच्या लोकांना ये जा करण्यासाठी सव्हिर्स रस्त्याची नितांत गरज आहे, नागरिकांची दैनंदिन रहदारी व ये जा करण्याची निकड लक्षात घेऊन नऊ मीटरच्या सर्व्हिस रोडवरील कच्ची व पक्की अतिक्रमणे काढण्यासाठी व सदर रस्ता मोकळा करण्यासाठी संयुक्त मोहीम राबवावी अशी सूचना पुढे येत आहे, शहरवासीयांची दैनंदिन गरज लक्षात घेऊन सर्व्हिस रोडच्या संदर्भातील अडथडे दूर करावे त व तात्काळ सदर रस्ता अतिक्रमण मुक्त करावा अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे.