बिगुल वाजलं! महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर ; वाचा वेळापत्रक??

एप्रिल 16, 2026 12:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठीचा निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी येत्या १२ मे २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी राज्याला ९ नवीन आमदार मिळणार आहेत.

vidhanparishad election

येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि राजेश राठोड यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, भाजपच्या पारड्यात ५ जागा जाण्याची शक्यता आहे, तर शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १ जागा जिंकू शकते. मात्र, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मते असल्याने आणि महायुतीने अधिक उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर असून, चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.या ९ जागांसह डॉ. प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीचे वेळापत्रक काय ?

महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना २३ एप्रिल २०२६ रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ आहे. अर्जांची छाननी २ मे २०२६ रोजी केली जाईल. ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी ४ मे २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी मतदान १२ मे २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडेल. मतदानानंतर त्याच दिवशी म्हणजे १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मतांची मोजणी केली जाईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now