⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाकडून आदेश पारीत झाल्यानंतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा व रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांची मतदार यांदी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, धरणगाव व यावल या बाजार समित्यांना मतदारांची प्राथमिक, तात्पुरती मतदार यादी सादर करण्याबाबत या कार्यालयामार्फत कळविण्यात आले होते. मात्र, बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका क्रमांक 11669/2021 व इतर संलग्न याचिका यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ नोव्हेंबर रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश दिले आहे.

याआदेशास अनुसरुन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव यांच्याकडील २२ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये प्राधिकरणाकडील ६ व २१ ऑक्टोबर रोजीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. या आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादीवर आक्षेप, हरकती मागविण्याची प्रक्रिया राबवलेली आहे ती प्रकिया रद्द करण्यात आलेली आहे. या आदेशामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून आदेश पारीत झाल्यांनतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे.