राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत मोठी बातमी
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ओक्टोबर २०२२ । गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा राजकारणात मोठ्याप्रमाणात गाजतोय. हे प्रकरण अजूनही गाजत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) नियुक्त आमदारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. यावेळी शपथपत्र दाखल न केल्याने सर्वोच्च न्यायलयाने शिंदे – फडणवीस सरकारला चांगले फटकारले आहे.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरील स्थगिती कायम ठेवत याबाबतची पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.तसेच राज्य सरकारला बाजू मांडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात केली जात होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 12 आमदारांच्या यादीचा मुद्दा राज्यपालांनी मुद्दामून प्रलंबित ठेवला, अशी टीकाही करण्यात आली होती.
दरम्यान, शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर 12 आमदारांच्या नियुक्तीवर तातडीने निर्णय घेण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आलेला होता. यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरील स्थगिती कायम ठेवण्यात आलीय.