Jalgaon : पोलिस असल्याचे सांगून भामट्यांनी वृद्धेचे दागिने लांबवीले; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

फेब्रुवारी 21, 2026 10:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात भामट्यांनी पोलिस असल्याचे भासवून ६५ वर्षीय वृद्धेची तब्बल १ लाख ५६ हजार १३१ रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

काय आहे घटना?
शहरातील रामपेठे भागात राहणाऱ्या कमलबाई एकनाथ सोनार (वय ६५) या जुने जळगाव येथील भाग्यलक्ष्मी चौकात सुरू असलेल्या भागवत सप्ताहामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी जात होत्या. त्या वेळी एका अनोळखीने थांबविले व पोलिस खात्यातील साहेब तुम्हाला बोलवत असल्याचे सांगितले.

रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या साध्या वेशातील व्यक्तीकडे या वृद्धा गेल्या असता त्याने सांगितले की, पुढे खून झालेला आहे, तुम्ही तिकडे जाऊ नका. तसेच दागिने अंगावर न ठेवता काढून ठेवा असे सांगितले. त्या वेळी वृद्धेने नकार देत कीर्तनाच्या ठिकाणी गेल्यावर काढून घेते असे सांगितले. त्या वेळी तेथे तिसरा व्यक्ती आला व त्याने त्याच्या हातातील ब्रास्लेट काढून तेथे उभ्या असलेल्या तोतया पोलिसाकडे दिले. त्यामुळे वृद्धेनेदेखील त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून दिली.

हातातील बांगड्या निघत नसल्याने समोरील व्यक्तीने काढण्यास मदत केली. त्यानंतर हे दागिने एका कागदात गुंडाळून वृद्धेजवळील पिशवीत ठेवले. काही अंतरावर गेल्यानंतर शंका आल्याने वृद्धेने कागद उघडून पाहिला असता त्यात दगड निघाले फसवणूक झाल्याचे लक्षात येतातचा महिलेने थेट शनीपेठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये व अशा प्रकारांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now