जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना अशातच शहरात पोलिस असल्याचे भासवून एका वृद्धाची तब्बल ११ लाखांहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन अनोळखी भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मूळचे जळगाव तालुक्यातील जळके येथील रहिवासी असलेले माधव पीतांबर पाटील (वय ७१, सध्या रा. उल्हासनगर) हे लग्नासाठी १० मे रोजी जळगावातील खोटेनगरातील विश्रामनगरात आले होते. दुपारी १२:१५ वाजता ते आपल्या नातवासोबत दुचाकीने ‘हॉटेल क्रेझी होम’ येथे होणाऱ्या लग्नासाठी निघाले होते.

महामार्गावरील आर.एल. हॉस्पिटलजवळ पोहोचले असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ४० ते ४५ वयोगटातील दोन व्यक्तींनी त्यांना पोलीस असल्याचे भासवून थांबवले आणि लायसेन्सची मागणी केली. यापूर्वीही त्यांनी एका अन्य दुचाकीस्वाराला थांबवले होते. त्यानंतर आणखी दोन जण दुचाकीवर येऊन पुढे चोरीची घटना घडल्याचे सांगून निघून गेले. यानंतर भामट्यांनी “पुढे सोने लुटीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तुमच्याकडील सोन्याचे दागिने काढून द्या, आम्ही ते सुरक्षित बांधून देतो,” असे सांगून विश्वास संपादन केला. त्यावर माधव पाटील यांनी ३.५ तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, २ तोळ्यांची सोन्याची चेन तसेच तीन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ११ लाखाहूंन अधिकचा ऐवज त्या दोघांकडे दिल्या.
भामट्यांनी हे दागिने कागदाच्या पुडीत बांधून परत दिले आणि त्यांना पुढे जाण्यास सांगितले. मात्र लग्नस्थळी पोहोचल्यानंतर पुडी उघडून पाहिल्यावर त्यामध्ये नकली अंगठ्या असल्याचे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.










