जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । बोदवड तालुक्यातील येवती येथील एकता महिला बचत गटाच्या वतीने तयार हाेणाऱ्या चविष्ट व रुचकर पापडांना महाराष्ट्रातच नाही तर आता थेट अमेरिकेतून मागणी आहे. त्यानुसार नागली, पालक, टोमॅटो, जिरा व मका अशा पाच चवींचे प्रत्येकी एक हजार पापड तयार करण्यासाठी गट कामाला लागला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत येवती येथील १० महिलांनी एकत्र येत दोन वर्षांपूर्वी ‘एकता महिला बचत गटा’ची स्थापना केली. सुरुवातीला नागली मसाला पापड, जिरा, तांदूळ, मैदा व पालक टोमॅटो असे पाच वेगवेगळे पापड करून बोदवड तालुका, भुसावळ, जळगाव, जामनेर, फत्तेपूर, शहापूर,भरूच आणि मुंबई येथे विक्री केले. पापडांची महती एका नातेवाइकाने मुंबईतील त्यांच्या नातेवाइकांना दिली. योगायोगाने तेथे त्यांचे अमेरिकेतील नातेवाईकदेखील आले होते. त्यांनी स्वत: या पापडांची चव घेतली. नंतर ऑर्डर दिली.
गटात यांचा समावेश
गटात पुताबाई रामभाऊ माळी, सीताबाई भगवान वाघ, अलका दिलीप माळी, निर्मलाबाई भीमराव वाघ, हाफिजाबी अन्वर पठाण, सईदाबी पठाण, जायदाबी कदिरखा पठाण, अंजनाबाई जगदेव वाघ, हमिदाबी मनसफखा पठाण व वत्सला महादेव वाघ यांचा समावेश आहे. त्यांना राज्य ग्रामीण जीवनाेन्नती अभियानाचे संदीप मेश्राम, सीमा सेवाने, अनिता चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
नागली, पालकसह ५ प्रकार
आठ-दहा दिवसांत अमेरिकेचे प्रतिनिधी भुसावळला येऊन हे तयार पापड घेऊन जाणार आहेत. अमेरिकेला नागली, पालक, टोमॅटो, जिरा व मका अशा पाच चवींचे प्रत्येकी एक हजार असे एकूण पाच हजार पापड तयार करून पाठवले जातील. छोटे पापड १०० रुपये शेकडा तर मोठे पापड १५० रुपये प्रति किलो आहे. या पापड विक्रीतून महिलांना दुप्पट नफा मिळतो.