⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

गिरीश महाजनांनी आयुष्यभर माझ्या चपलांची पूजा केली, खडसेंनी महाजनांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan)आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे(Eknath khadse) एकमेकांवर  टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान, खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले अन् प्रसाद संपला तर बाहेर आले अन् चप्पल चोरीला गेली अशी झालीय, असा निशाणा गिरीश महाजन यांनी  एकनाथराव खडसेंवर साधला होता. आता  त्यानंतर  गिरीश महाजन हा नेहमी माझ्या पादत्राणांच्या जवळ वाढले, म्हणत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार  एकनाथ खडसेंनी महाजन यांच्यावर पलटवार केलाय.

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या टीकेबाबत बोलताना गिरीश महाजन हे आयुष्यभर माझ्याच पादत्राणापाशी वाढल्याची आठवण त्यांना करून दिली. तसेच गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या चपलांची पूजा केली. स्वाभाविक त्यांचं लक्ष माझ्या चपलांजवळच असणार, माझ्या चपला घेऊनच ते चालत होते, तसेच मत मागत होते. त्यामुळे माझ्या चपलांची त्यांना जास्त काळजी वाटते. असा टोलाही खडसेंनी लगावला आहे. तसेच गिरीश महाजन हे बालिश आहेत. त्यांना कोणीही सिरीयस घेत नाही. असे म्हणत खडसेंनी महाजनांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

खडसांना महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर
आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेत आमदार झाल्यावर खरं तर वाटत होतं की आपण मंत्री होऊ, पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेची शपथ घेतली आणि महाविकास आघाडीत आले आणि महाविकास आघाडीचं सरकारच गेलं. त्यामुळे खडसेंना तर आमदारकीवरच समाधान मानावं लागेल, पंगत बसली आणि बुंदी संपली सोशल असं सोशल मीडियावर असं ऐकलं होतं. त्यापेक्षा मी असं ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, मंदिराच्या बाहेर गेले आणि शप्पल चोरीला गेली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंचे खिल्ली उडवली होती, सोशल मीडियावर अनेक गमती जमती घडतात. तसाच एक योगायोग खडसेंच्या बाबतीत घडलाय, असेही गिरीश महाजन म्हणाले होते, त्यालाच आता खडसेंनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.