⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘रात्रीस खेळ चाले’; गुजरातमध्ये शिंदे-फडणवीसांच्या गुप्त बैठकीची चर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष कोणासाठी घातक ठरतो हे येणारा काळच सांगेल. मात्र शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे सरकारला आव्हान दिले जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीस यांची गुप्तपणे भेट घेतल्याचे वृत्त आहे. यामुळे राज्यात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

बडोद्यात शिंदे-फडणवीस भेट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे काल रात्री अचानक गुजरातमध्ये पोहोचले होते. खाजगी कारने गुवाहाटी विमानतळावर गेले आणि तेथून चार्टर्ड विमानाने गुजरातला पोहोचले. त्यांनी वडोदरा येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल रात्री दहा तास बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते कुठे होते, हे बऱ्याच दिवसांनी उघड झाले. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची वडोदरात भेट झाली. देवेंद्र फडणवीस यांनी रात्री सागर बंगला सोडला आणि चार्टर्ड विमानाने इंदूरला पोहोचले. त्यानंतर ते इंदूर विमानतळावर न जाता वडोदराला रवाना झाले.

बंडखोरांवर कारवाई करणार..
दुसरीकडे, एकनाथ शिंदे गुवाहाटीहून थेट बडोदा गाठून शनिवारी सकाळी गुवाहाटीला परतले. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या राजकीय संकटाचा आज सलग पाचवा दिवस आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर कारवाई केली जाईल, असे उघडपणे सांगितले होते. यावेळी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसून युतीचे सरकार कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.