उद्धव ठाकरेंची पुन्हा कोंडी? ठाकरे गटाप्रमाणे आता शिंदे गटानेही ‘या’ चिन्हांवर केला दावा
जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर दोन्ही गटांना नवीन पर्याय सादर करण्यासाठी आज दुपारपर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी पक्षचिन्हांची यादी सादर करण्यात आली होती. त्यात त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशालचा समावेश आहे. मात्र अशातच आता शिंदे गटानंही पक्षचिन्हांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या चिन्हांवर दावा केल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाप्रमाणे शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल या चिन्हांवर दावा केला असल्याची माहिती मिळतेय. आता दोन्ही गटांकडून सारख्याच चिन्हांची मागणी केल्यामुळे ही दोन्ही चिन्हही आता निवडणूक आयोग बाद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फक्त चिन्हच नव्हे तर ठाकरे गटाप्रमाणेच शिंदे गटानेही एकाच नावावर दावा केल्याची माहिती मिळतेय. शिवसेना- बाळासाहेब ठाकरे या एकाच नावावर दोन्ही गटांकडून दावा केला जातो आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग कोणाला कोणतं चिन्ह देतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही गटांनी सारख्याच चिन्हांचा दावा केल्यामुळं आता निवडणूक आयोग ही दोन्ही चिन्ह बाद करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यासंदर्भात काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज दुपारपर्यंत दोन्ही गटांना आपले पर्याय सुचवण्याची मुदत आयोगाकडून देण्यात आली आहे.