⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

शिंदे-फडणवीस पुन्हा दिल्ली दौऱ्यावर ; मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । राज्यात शिंदे गट आणि भाजपचे नवीन सरकार स्थापन होऊन महिना उलटला. मात्र अद्यापही या नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? मंत्रिमंडळात भाजप (BJP) आणि शिंदे (Shinde) गटातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

अशातच अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही दिल्लीतच असतील. त्यामुळे शासकीय बैठकांच्या निमित्ताने दिल्ली गाठणारे शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराचा खलिता घेऊन परतणार का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचंही लक्ष लागलं आहे.

गेल्या महिन्याभरातील हा शिंदेंचा सहावा दिल्ली दौरा आहे. याशिवाय त्यांनी राजधानीचे गुप्त दौरे केल्याच्याही चर्चा असतात. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न येताच ‘तारीख पे तारीख’ हा एकच डायलॉग ऐकायला मिळतो. त्यातच शिंदे-फडणवीस दोन दिवस दिल्लीतच असल्यामुळे रविवारी होणारा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारही पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.

दरम्यान, शिंदे-भाजप सरकारमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असून नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची याबाबतची यादी भाजपाने फायनल केली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी मंत्रिमंडळात नवे चेहरे दिसण्याची शक्यता अधिक आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी अशी भाजपाच्या पक्षक्षेष्ठींची इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यंदा भाजपाकडून काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस दोनच दिवसांपूर्वी एक दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी पक्षश्रेष्ठींसोबत त्यांनी कॅबिनेट विस्तारावर चर्चा केल्याची माहिती आहे. नेमक्या कुठल्या कारणावरुन मंत्रिमंडळ विस्तार रखडला, हे स्पष्ट नाही. मात्र वजनदार खात्यांवरुन भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच होत आहे का, असा सवाल विचारला जात आहे. तर सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे विस्तार रखडल्याचेही सांगितले जात आहे.