जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो समोर आल्यांनतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे धनंजय मुडेंनी ट्विट करत म्हटले. यावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंवर संताप व्यक्त केलाय. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी स्वतःचे उदाहरण देत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे म्हणाले की, धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे. गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी करण्यात येत होती. त्यांनी आज राजीनामा दिला. मला वाटतं की त्यांनी या आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. जर कुणाची अशी निर्घुण हत्या करणाऱ्यांना साथ असेल असे निष्पन्न होत असेल तर ते दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मी माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिलेला आहे. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलेला आहे, असे त्यांनी म्हटलेले नाही. याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, कोणीही व्यक्ती राजीनामा दिल्यानंतर काहीतरी कारण शोधत असतो. तसंच कारण मुंडे साहेबांनी शोधलेले दिसत आहे. नैतिकता दाखवत राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्या बाबतीत घडलं होतं. वास्तविक पाहता माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. मी काही ती जमीन घेतली नव्हती किंवा आजही घेतलेली नाही. फक्त साधी मीटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला होता. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यायचं म्हटलं तर या मंत्रिमंडळातील एकही सदस्य राहू शकणार नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचं म्हटलं तर प्रत्येकालाच राजीनामा द्यावा लागेल. त्यांच्याकडे नैतिकता शिल्लकच राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला इतके दिवस वाट बघावी लागली, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.