जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२५ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप (BJP) नेतृत्वावर खरमरीत टीका केलीय. पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त अशा चौकटीतील होती. आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक पक्षात घेतले जात आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आज 90 टक्के लोक हे बाहेरचे असून अगदी दाऊदचा हस्तक असलेला सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला देखील भाजपमध्ये घेतले, असा टीका एकनाथ खडसेंनी केली.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी एकनाथ खडसे हे आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खडसे म्हणाले की, ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्ष नेता असताना टीका केली होती. ते आज पक्षात आहेत. 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तेही आज भाजपसोबत आहेत, अगदी दाऊदचा हस्तक असलेला सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला देखील भाजपमध्ये घेतले असा टोला एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. त्यामुळे भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला आहे. मी अंधारात असताना मला साथ देणार्या शरद पवार यांच्यासोबतच मी असणार असल्याचे खडसे यांनी सांगीतले.

भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहेत का? असे विचारले असता खडसे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चिट दिली. यासाठी फडणवीस यांना एकट्याला दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते यास जबाबदार असल्याचे आहेत, असे खडसेंनी म्हटले आहे.
गिरीश महाजन यांच्यावर निशाणा
मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता. मी मंत्री असताना त्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. मी गेल्यावर महाजन कार्यकर्त्याचा मंत्री झाला, असे म्हणत गिरीश महाजन यांच्यावरही खडसेंनी टीका केली.









