जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२५ । राज्यात हनीट्रॅपच्या प्रकरणात अटकेत असलेला प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीबाबत मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात वेगवेगळे दावे केले जात असून एकमेकांवर निशाणा साधला जातोय. या वादात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उडी घेत एकनाथ खडसेंना अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली आहे तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप केले. तर जळगावमधील भाजपच्या काही आमदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत खडसेंवर सडकून टीका केली. आता त्या टीकेला एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं.

त्यांनी थेट चव्हाण यांना आव्हानच दिलं आहे. मंगेश चव्हाण यांनी माझ्या आपल्या विरोधातील एक तरी पुरावा दिला तर मी राजकारणातून सन्यास घेईल असं आव्हानच खडसे यांनी आता चव्हाण यांना केलं आहे.

मला आनंद वाटला असता ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, कर्जमाफी विषयी झाली असती तर, परंतु ही पत्रकार परिषद नाथाभाऊंना टार्गेट करण्यासाठी आमदारांना आणि इथल्या मंत्र्यांना घ्यावी लागली, त्यांना ही पत्रकार परिषद का घ्यावी लागली? त्यांची मजबुरी मी समजू शकतो. मला या आमदारांवर फार काही बोलायचं नाही, कारण आता जे आमदार आहेत, त्यांना मीच घडवलेलं आहे, असा टोला यावेळी एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
चव्हाण काय म्हणाले होते?
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ‘एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. त्या महिला रात्र-रात्र यांच्याकडे येऊ राहायच्या, सकाळी लोकं त्यांना सोडायला जायचे, असा बघणारा व्यक्ती सांगत होता, असा आरोप चव्हाण यांनी खडसे यांच्यावर केला होता. तसेच एकनाथ खडसे मातब्बर नेता होऊच शकत नाही. तो भिकारXX नेता आहे. अशीही टीका आमदार चव्हाण यांनी केली होती.









