जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२५ । महाराष्ट्रात सध्या हनी ट्रॅप प्रकरण चांगलेच गाजत असून हनी ट्रॅपप्रकरणात प्रफुल लोढाला अटक करण्यात आलीय. तर या हनी ट्रॅपप्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे दोन्ही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. अशातच गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंच्या मुलाचे हत्याप्रकरणच चर्चेत आणल्याने खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे समोर आले पाहिजे. खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला, असे प्रफुल लोढाने सांगितल्याचा दाखला गिरीश महाजन यांनी दिला होता. आता, महाजनांच्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली. हिंमत असेल तर या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करावी, अशी मागणी खडसेंनी केली आहे.

माझ्या मुलाच्या प्रकरणात गिरीश महाजनला आव्हान आहे की, माझ्या एकुलत्या एक मुलाच्या खुनाचा आरोप माझ्यावर करतात, हिमंत असेल तर तात्काळ याप्रकरणाची चौकशी करा, असे एकनाथ खडसेंनी म्हटलं. निखिल खडसेंचा मृत्यू झाला त्यावेळी 3 दिवस मी घरीच नव्हतो, त्याच्या मृत्यूच्या दिवशी देखील नव्हतो. माझ्याकडे जमिनी शिवाय काहीच नाही, गिरीश महाजन हा शाळा मास्तरचा पोरगा, मग याच्याकडे इतका पैसा कुठून आला? ह्याच्या जावयाच्या नावाने संपत्ती ठेवली आहे. ह्याचा तीन बत्ती येथे फ्लॅट आहे, तो किती किमतीचा आहे याची माहिती घ्या? असे म्हणत गिरीश महाजनांच्या मालमत्तेवर खडसेंनी सवाल उपस्थित केले आहेत.









