⁠ 
बुधवार, मे 1, 2024

आता नाथाभाऊंनीही कारसेवेला गेल्याची 34 वर्षांपूर्वीची पत्रिका आणली समोर

जळगाव लाईव्ह न्यूज । 21 जानेवारी 2024 । कारसेवेच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील काही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. कार सेवेच्या आरोप प्रत्यारोपावरून राज्यातील नेत्यांकडून कारसेवेचे पुरावे सादर केले जात आहेत. यातच उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवा करतानाचा फोटो ट्विट केला. यानंतर आता तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही कारसेवेला गेल्याची एक 34 वर्षापूर्वीचं पत्रकच व्हायरल केलं आहे.

खडसेंनी कारसेवक असल्याचा पुरावा दिला आहे. एकनाथ खडसे यांनी 1990मधील एक पत्रिका दाखवली आहे. त्यात आमदार एकनाथ खडसे असा नाथाभाऊंचा उल्लेख आहे. या पत्रिकेत जळगाव जिल्ह्यातील कारसेवकांची नावे आहेत. त्यात नाथाभाऊंचं नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर कारसेवला जात असतानाच फोटो टाकताच खडसेंकडूनही कारसेवक म्हणून उल्लेख असलेली पत्रिका व्हायरल करण्यात आली आहे.

का आहे पत्रिकेत?
ही पत्रिका 34 वर्षापूर्वीची आहे. श्रीराम कार सेवा समिती आणि विश्व हिंदू परिषदेने हे पत्रक काढलं आहे. या पत्रकारवर चलो अयोध्येचं आवाहन करण्यात आलं आहे. या पत्रिकेत 19 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990पर्यंतचा कार्यक्रम देण्यात आला आहे. 15 सप्टेंबर 1990 ते 25 सप्टेंबर 1990 पर्यंत जनसंकल्प दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सभा, युवक मेळावे, महिला मेळावे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर 29 सप्टेंबर 1990 रोजी म्हणजे विजया दशमीच्या दिवशी विजय यात्रा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवशी प्रत्येक तालुक्यातून विजययात्रा काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तर, 29 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990 दरम्यान श्री प्रभू राम ज्योती यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

image 1
आता नाथाभाऊंनीही कारसेवेला गेल्याची 34 वर्षांपूर्वीची पत्रिका आणली समोर 1

या पत्रिकेतून कारसेवा नोंदणीचं आवाहनही करण्यात आलं होतं. तसेच जिल्ह्यातील कारसेवा समिती सदस्यांची यादीही देण्यात आली होती. या यादीत आमदार एकनाथराव खडसे असा खडसे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुक्ताईनगरमधील एकमेव कारसेवक म्हणून एकनाथ खडसे यांचा या पत्रिकेत उल्लेख आहे. तब्बल 34 वर्षांपूर्वीची ही पत्रिका आहे. ही पत्रिका प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून एकनाथ खडसे हे कारसेवक होते आणि ते कारसेवेला गेल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.