जळगाव लाईव्ह न्यूज | 24 मे 2024 | गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. सध्या तापमानाचा पारा 45 अंशपर्यंत गेल्याने उष्णतेच्या लाटेत जळगावकर अक्षरशः होरपळून निघत आहे. याच दरम्यान, या उष्ण लाटामंध्ये ४८ तासांतच विविध आजारांनी ग्रासलेल्या आठ बेवारसांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे मृत्यू उष्माघातामुळे झालेले नसल्याचे स्पष्टीकरण अधिष्ठाता यांनी दिले आहे. दरम्यान, मृतांमध्ये तिघांची ओळख पटली असून पाच जणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शवागारगृहात आहेत.
जीएमसीच्या शवागारगृहात असलेल्या मृतदेहांमध्ये सर्वच पुरुष असून ३५ ते ७५ वयोगटातील आहेत. सिरालाल सोलंकी (वय ३५, रा. दोंदवाडा, मध्य प्रदेश), मधुकर संपत निकम (वय ७३, रा. भाटगळी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा) व वाल्मीक गोपीचंद बिडकर (वय ४२, रा. अंतुर्ली बु, ता. भडगाव) अशी तिघांची ओळख पटली आहे.

सोलंकी याला नशिराबाद पोलिसांनी १०८ या रुग्णवाहिकेतून दाखल केले होते तर अन्य सर्वांना सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकांनी दाखल केले होते. वैद्यकीय सूत्रांच्या मते या सर्वांचा मृत्यू उष्माघातामुळे झालेला नाही; परंतु यातील जवळपास सर्वांनाच कोणता ना कोणता आजार होता. आजारामुळे आधीच प्रतिकारशक्ती कमी झालेली. त्यात राहायला घर नाही.
रस्त्यावर जागा मिळेल तेथे थांबणे. बेवारस असल्याने जेवणही नाही. भीक मागून खाणे, कधी जेवण मिळाले तर कधी मिळत नाही. उष्ण लाटेत जिवाची लाही लाही होत असताना शरीर तृप्त होण्यासाठी ना पोटभर जेवण, ना गार पाणी, अशी अनेक कारणे असून त्यामुळे प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला







