जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२५ । स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेसच्या रूममध्ये सुरु असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत जवळपास २० लाख रुपयांच्या मुद्देमालासह ८ जुगारींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदानाजवळील रूम नंबर २०९ मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, त्यांनी पथक तयार करून ११ जुलै रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस गाठून खात्री केली. हॉटेलमधील रुम नंबर २०९ ही मदन लुल्ला याच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने छापा टाकला असता, तिथे ८ इसम जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले.

त्यांच्याकडून १९ लाख ९७ हजार रुपये किमतीचे रोख रक्कम व वेगवेगळया कपंनीचे १३ मोबाईल हॅन्डसेट असा मुद्देमाल मिळून आला आहे. अटक केलेल्या ८ जणांविरोधात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीनुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान पथकाने केलेल्या कारवाईत हॉटेलमध्ये पप्पु सोहम जैन, वय-४४, रा. बळीरामपेठ, भैय्या हवेली जवळ जळगांव, रुखील वय-३०, रा.एमआयडीसी, जळगाव, भावेश पंजोमल मंधाण, वय-३७, रा.राजाराम नगर सिंधी कॉलणी, जळगांव, मदन सुंदरदास लुल्ला, वय-४२, रा.गणपतीनगर जळगांव, सुनील शंकरलाल वालेचा वय-४०, रा.सिंधी कॉलनी कंवरनगर, जळगांव, अमीत राजकुमार वालेचा वय ४५, रा.गणेशनगर जळगांव, विशाल दयानंद नाथानी, वय-४८, रा. गणेश रा.गायत्रीनगर घर नं.७० जळगांव, कमलेश कैलाशजी सोनी, वय-३६, रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड, जळगांव हे मिळून आले.












