जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील दहिगाव–साकळी गटात सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने कार्य करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेतृत्व म्हणजे ॲड. देवकांत बाजीराव पाटील. कोणताही राजकीय वारसा किंवा घराणेशाहीचा आधार नसताना, केवळ संघर्ष, सेवा आणि ठाम विचारसरणीच्या जोरावर त्यांनी लोकाभिमुख नेतृत्व उभे केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी, युवक, शेतकरी, महिला, दलित, आदिवासी आणि वंचित घटकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. पाणीटंचाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, शैक्षणिक समस्या, सहकारी संस्थांतील अन्याय, तसेच ग्राहक हक्क यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी निवेदने, आंदोलने आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत प्रभावी भूमिका बजावली आहे. “प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष” हीच त्यांची कार्यशैली ठरली आहे.ग्रामीण पार्श्वभूमीतून संघर्ष करत शिक्षण पूर्ण करून त्यांनी विधी पदवी संपादन केली आणि वकिली व्यवसायातून सामाजिक न्यायासाठी काम सुरू ठेवले. विरावली येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या त्यांच्या प्रवासाने अनेक तरुणांसाठी प्रेरणादायीउदाहरण निर्माण केले आहे.

संघटनात्मक पातळीवरही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून ग्रामपंचायत, सहकारी संस्था आणि विविध निवडणुकांमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. बूथ पातळीपासून तालुका व जिल्हा स्तरापर्यंत कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधत त्यांनी पक्षनिष्ठा टिकवून ठेवली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले आहेत. युवकांसाठी करिअर मार्गदर्शन, कायदेशीर साक्षरता, स्वयंरोजगार प्रशिक्षण, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून अनेकांना दिशा दिली. महिला सक्षमीकरण, वृक्षलागवड, स्वच्छता अभियान आणि “बेटी बचाव–बेटी पढाव” सारख्या उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी रक्तदान शिबिरे, औषधोपचार मदत, धान्य व किराणा किट वाटप यांसारख्या उपक्रमांतून निःस्वार्थ सेवा बजावली. कोणतीही प्रसिद्धी न करता केलेले हे कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे.
संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, बालसंगोपन योजना तसेच अपंग, विधवा व घटस्फोटीत महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा केला. युवकांना बँक कर्ज, उद्योग मार्गदर्शन व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कौतुक केले आहे. तालुका व जिल्हा पातळीवर ते राष्ट्रवादी विचारांचे ठाम समर्थक म्हणून ओळखले जातात.
आज दहिगाव–साकळी गटात “पदाशिवाय काम करणारा नेता” अशी ओळख निर्माण केलेले ॲड. देवकांत पाटील हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसमावेशक, विकासाभिमुख आणि परिवर्तनवादी नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे निर्माण झालेला विश्वास आणि व्यापक जनसंपर्क यामुळे ते गटातील जनतेच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू ठरत आहेत.












