⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोठी बातमी ! महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याच्या घरावर ईडीची छापेमारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । राज्य सरकारमधील मंत्र्यांवर ईडीनं (ED) कारवाईचे सत्र सुरूच ठेवले असून महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याच्या घरावर ईडीनं (ED) आज गुरुवारी पहाटेपासून छापेमारी केली आहे. राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ईडीनं (ED) छापेमारीला सुरुवात केल्यानं महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल.

ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यामध्ये अनिल परब (Anil Parab) यांचे शासकीय निवासस्थान आणि वांद्रे येथील घराचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले. अनिल परब सध्या याचठिकाणी उपस्थित असल्याचे कळते.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. पोलीस बदली प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.

ईडीच्या छाप्यांमागे सचिन वाझे कनेक्शन?
पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परबा यांचे नाव समोर आले होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू झाला. त्याच अनुषंगाने ईडीने आज छापा मारला.