जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मोठ्या अडचणीत सापडली आहे. खंडणी प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने जॅकलिनची ७.२७ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. जॅकलिनच्या 7.12 कोटींच्या मुदत ठेवीचाही या जप्त केलेल्या मालमत्तेत समावेश आहे.
सुकेशकडून भेटवस्तू घेऊन जॅकलीन अडकली :
ईडीच्या म्हणण्यानुसार, ठग सुकेश चंद्रशेखरने खंडणीच्या पैशातून जॅकलिनला ५.७१ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्या. कुटुंबाला दिलेल्या भेटवस्तूंमध्ये कार, महागड्या वस्तू आणि निधीचा समावेश आहे. जॅकलीन फर्नांडिस बऱ्याच दिवसांपासून ईडीच्या रडारखाली होती. जॅकलिन आणि ठग सुकेश चंद्रशेखर यांच्यातील संबंध उघड झाल्यापासून जॅकलीनचे नाव वादात सापडले आहे.
जॅकलिनवर आणखी कारवाई शक्य:
दिल्लीच्या तुरुंगात असताना सुकेशने एका महिलेची २०० कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यानंतर याच खंडणीच्या पैशातून सुकेशने जॅकलिनला करोडोंच्या महागड्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये हिरे, दागिने, 52 लाखांच्या घोड्यासारख्या महागड्या भेटवस्तूंचा समावेश आहे. हे सर्व पैसे सुकेशने गुन्हे करून कमावले. त्यामुळे ईडी सुकेशवर कडक कारवाई करत आहे. गेल्या एक वर्षापासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. सुकेशच्या फसवणुकीप्रकरणी जॅकलिनची ईडीने अनेकदा चौकशी केली आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, जॅकलीन फर्नांडिसवर सध्या ही सुरुवातीची कारवाई आहे. या प्रकरणात जॅकलिन आणखीनच अडकू शकते. ईडी जॅकलीनची आणखी मालमत्ता संलग्न करू शकते.