जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । मुक्ताईगर डेपोच्या बसला गौण खनिज वाहून नेणाऱ्या वेगवान डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बस चालकासह सात प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना तरोडा ते रुईखेडा या गावांच्या मध्ये घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की मुक्ताईनगर डेपोची मुक्ताईनगर ते मलकापूर ही बस आज दुपारी मलकापूर कडे जात होती. दरम्यान गौण खनिज घेऊन अतिशय भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने या बसला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बसचा चालक गंभीर जखमी झाला असून अन्य सात प्रवासी देखील जखमी झालेले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.










