मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मार्च 4, 2026 4:02 PM

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

drup hsp

जळगाव लाईव्ह न्यूज । जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रहिवासी सुर्यभान रोडगे (वय ६२) यांच्यावर मानेच्या मणक्यावरील अतिशय गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना नवे आयुष्य मिळाले आहे.

याबाबत माहिती अशी की, कैर्‍या तोडत असताना झाडावरून अचानक खाली पडल्याने सुर्यभान रोडगे (वय ६२) यांच्या मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातात त्यांच्या हाता-पायांची ताकद पूर्णपणे निघून गेली होती.अपघातानंतर रुग्णाला तातडीने जालना येथून डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने तात्काळ मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी सखोल तपासणी केली. यामध्ये एमआरआय व सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली असता मानेच्या सी ७ मणक्याला फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले. या फ्रॅक्चरमुळे मज्जासंस्थेवर दबाव येऊन रुग्णाच्या हात-पायांची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती.

रुग्णाची अवस्था लक्षात घेता तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मेंदू व मणक्याच्या तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी रुग्णावर सी ७ कॉर्पेक्टोमी विथ केज फिक्सेशन ही अत्यंत अवघड व जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या शस्त्रक्रियेत फ्रॅक्चर झालेला मणका काढून त्या ठिकाणी इम्प्लान्ट व केज बसवून मणक्याला योग्य आधार देण्यात आला. विशेष म्हणजे या संपूर्ण उपचारासाठी रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळाला. महागड्या शस्त्रक्रियेचा खर्च या योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबासाठी ही योजना वरदान ठरली. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. हळूहळू त्यांच्या हात-पायांची ताकद पूर्ववत होऊ लागली असून सध्या ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकत आहेत. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील फिजिओथेरपी सुरू असून रुग्ण पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहे.या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अतुल जाधव, डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शीतल फेगडे, डॉ. मारीया, शालीक चौधरी यांनी सहकार्य केले.

मानेच्या मणक्याचे फ्रॅक्चर हे अतिशय संवेदनशील आणि जीवघेणे असू शकते. वेळेत योग्य तपासणी व तातडीने शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्णाचे हात-पाय पुन्हा कार्यरत होऊ शकले. अशा अपघातानंतर उशीर न करता तज्ज्ञांकडे उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • डॉ. प्रितम दास,
    निवासी डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now