जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे बायोकेमस्ट्री विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रकाश तिरुवा यांना मालवांचल विद्यापीठ, इंदूर यांच्यामार्फत मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. तिरुवा यांनी प्रा. डॉ. सविता राठौर, प्राध्यापक, जैवरसायनशास्त्र विभाग, इंडेक्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (आयएमसीएचआरसी), इंदूर (मध्य प्रदेश) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.त्यांच्या संशोधन प्रबंधाचे शीर्षक होते. “हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांमधील थायरॉईड कार्य चाचणी, लिपिड प्रोफाईल, एचएस—सीआरपी पातळी आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स यांचा तुलनात्मक अभ्यास.‘या संशोधनामध्ये हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांमध्ये थायरॉईड कार्य चाचण्या, लिपिड प्रोफाइल, उच्च-संवेदनशील सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन (एचएस—सीआरपी) आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स यांमधील परस्परसंबंधाचा सखोल अभ्यास करण्यात आला.

या संशोधनामुळे हायपोथायरॉईडीझममुळे शरीरात होणारे जैवरासायनिक व दाहजन्य बदल अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होणार असून, निदान व उपचार अधिक प्रभावी होण्यास हातभार लागणार आहे.त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचे बाह्य परीक्षक म्हणून डॉ. दीप्ती अग्निहोत्री, प्राध्यापक व विभागप्रमुख, जैवरसायनशास्त्र विभाग, एलएनसीटी मेडिकल कॉलेज, इंदूर (मध्य प्रदेश) यांनी काम पाहिले.डॉ. तिरुवा यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सहकारी, विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








