⁠ 
शनिवार, मे 4, 2024

डॉ.निलेश किनगेकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो, गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । शहरातील अँक्सॉन ब्रेन हाॅस्पीटलचे संचालक डॉ.निलेश किनगे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी व आमचा छळ केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार दीपक छगन कावळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह महापौर, पोलीस अधीक्षक, जळगाव, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. पैसे परत देण्याचे आदेश असतानाही गेल्या सहा महिन्यापासून रुग्णालय प्रशासनाकडून फिरवाफिरव करण्यात येत असल्याचे कावळे यांनी जळगाव लाईव्ह न्युजशी बोलताना सांगितले.

दिपक छगन कावळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी आई दि. १० सप्टेंबर २०२० रोजी अँक्सॉन ब्रेन हाॅस्पीटल जळगाव याठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी ते कोविड पॉसिटीव्ह असल्याचे डॉ. निलेश किनगे यांनी आम्हाला तोंडी सांगितले व आपण टेस्ट करू असे सांगितले. पण नंतर त्यांनी नातेवाईकांना देखील आत जाण्यास मनाई केली यांनी टेस्ट केली कि नाही या बद्दल आम्हाला काहीही कल्पना दिली नाही. माझी आई एकूण २६ दिवस त्याठिकाणी कोविड-१९ चा उपचार घेत होती. शासन नियमानुसार सरासरी अंदाजे १ लाख ५० हजारपर्यंत बिल निघणे अपेक्षित होते, या संबंधी आपण डॉ. निलेश किनगे व त्याचे मेडिकल व्यवस्थापक गजानन पाटील यांच्याकडे आपण शासन नियमानुसार आपली फी घेण्यासाठी विनंती केली. परंतु डॉ. निलेश किनंगे व त्याचे मेडिकल व्यवस्थापक गजानन पाटील यांनी पैसे देत असाल तर ठीक आहे नाही तर आताच्या आता व्हेंटिलेटर काढतो व तुमचे पेशंट कंपाउंडमध्ये आणून ठेवतो. मग ते मरो कि काहीही हो अशा धमक्या दिल्या. मी प्रचंड घाबरलेलो होतो. त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. शेवटच्या दिवशी त्यांनी ४ लाख ६० हजारचे बील काढल्यावर मला धक्काच बसला. मी माझ्या भावाला विनंती करून ते पैसे भरण्यास सांगितले. यानंतर आपण या संदर्भात मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. यावर सुनावणी होवून २ लाख ४४ हजार रूपये परत करण्याचे आदेश उपलब्ध असलेल्या औषधी बीलांच्या आधारे करण्यात आले.

सदर आदेशाला ६ महीने झाले असून डॉ. निलेश किनंगे माझी दिशाभूल करीत आहे. पण तू फेऱ्या मारू नको तू कोणाकडेही गेला तरी तुला ते पैसे आता मिळणार नाहीत, असे सांगतात. मला पैशाची आवश्यकता आहे. डॉ. निलेश किनगे व गजानन पाटील हे मला दिवसेंदिवस तू सेटलमेंट करून घे. नाही तर एक रूपया ही तूला मिळणार नाही, असे म्हणत मानसिक छळ करत आहे. तरी माझ्याकडून शासन नियमापेक्षा अधिक पैसे आकारल्याप्रकरणी तसेच माझा मानसिक छळ केल्याप्रकरणी व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या देखील आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी डॉ.निलेश किनगे व गजानन पाटील यांच्याविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. डॉ. निलेश किनगे प्रकरणात महापौर, पोलीस अधीक्षक, जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. एवढेच नव्हे तर रामानंद पोलीस स्टेशनला फिर्याद देखील देण्यात आली आहे.