जळगाव लाईव्ह न्यूज । पश्चिम-आशियातील सुरू असलेल्या युद्धाचा भारतासह अनेक देशांना फटका बसत आहे. अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपणार याकडे अख्या जगाचं लक्ष लागून आहे. मात्र या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे. यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. करारासाठी इराणने सहमती दर्शवली नाही, तर त्यांच्या सर्व वीज निर्मिती प्रकल्पांवर एकाच वेळी मोठा हल्ला केला जाईल, अशी स्पष्ट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

गुरुवारी अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना ट्रम्प यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ ही मोहीम अजून सुरू असून पुढील दोन ते तीन आठवड्यांत अधिक कठोर कारवाई केली जाईल. इराणमधील प्रमुख लक्ष्य पूर्णत्वाच्या जवळ पोहोचले असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, या हल्ल्याचा उद्देश सत्तापालट करणे नसून इराणच्या लष्करी क्षमतेला मोठा धक्का देणे हा आहे, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. त्यांनी दावा केला की, इराणचे नौदल आणि हवाई दल मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या अनेक सर्वोच्च नेत्यांचा मृत्यू झाला आहे.
या घडामोडींमुळे पश्चिम-आशियातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून जागतिक स्तरावर या युद्धाकडे चिंतेने पाहिले जात आहे.









