जळगावला नव्या MIDC ची चर्चा पण आधीच्या MIDC चे बारा वाजलेय, त्याचे काय?

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ डिसेंबर २०२२ | जळगाव शहरालगत उजाड कुसुंबा परिसरातील ३७ एकर जागेवर नव्या एमआयडीसी (MIDC)चा प्रस्ताव आहे. विद्यापीठाजवळही मोठी जागा आहे. शहरात नवीन उद्योग येण्यासाठी आपण नुकतीच उद्योगमंत्री उदय सावंत यांच्याशी चर्चा केली असल्याचा दावा जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी केला आहे. यामुळे जळगाव शहर व जिल्ह्याच्या रखडलेल्या औद्योगिक विकासाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. जळगावमध्ये नवी एमआयडीसी (MIDC) येत असेल तर स्वागतच आहे मात्र सध्याच्या एमआयडीसीचे बारा वाजले आहेत. ६३२ हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या जळगाव एमआयडीसीमधील सुमारे ४० टक्के उद्योग बंद पडले आहेत. जे २५०० उद्योग सुरु आहेत त्यापैकी ५० टक्के उद्योग अडचणीत आहेत. याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. MIDC Jalgaon

सुवर्णनगरी, डाळ नगरी, प्लॅस्टिक नगरी अशी जळगावची एकेकाळी ओळख होती. जळगाव एमआयडीसी (MIDC)मध्ये डाळ मिल, प्लॅस्टिक किंवा चटई कंपन्या, तेल निर्मिती कंपन्या, कृषी निगडीत उद्योग, इंजिनिअरिंग वर्कशॉप्स, केमिकल कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कधीकाळी जळगावातील चटई उद्योग प्रसिध्द होता. पाइप, ठिबकच्या उद्योगाप्रमाणेच या उद्योगाला कधीकाळी मोठे वैभव होते. साधारण दशकापूर्वी येथील औद्योगिक वसाहत परिसरात चटई उत्पादन घेणारे दोनशेपेक्षा अधिक युनिट कार्यरत होते.

मात्र, कालांतराने या उद्योगासमोर वारंवार येणार्‍या अडचणींच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने हे युनिट बंद होत गेले. तशीच परिस्थिती डाळ उद्योगांची अशीच अवस्था झाली आहे. सध्यस्थितीत जळगाव एमआयडीसीत (MIDC) डाळ प्रक्रिया, तेल निर्मिती कंपन्या, कृषिवर आधारित पीव्हीसी पाइप, ठिबकच्या नळ्या व चटई उत्पादन घेणार्‍या कंपन्यांची संख्या अधिक आहे. केमिकल्सचे चार-पाच प्लँट आहेत. जळगावमध्ये जैन उद्योग समुह, रेमंड, सुप्रीम, स्पेक्ट्रम, एफबीएमएलसारखे मोजकेच मोठे उद्योग कार्यरत आहेत.

जळगाव शहराचा औद्योगिक विकास करण्याच्या हेतूने राज्यातील पहिली इंडस्ट्रिरल टाऊनशिप जळगाव औद्योगिक वसाहतीत स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, नंतर मनपाने घेतलेली विरोधातील भूमिका आणि राज्य सरकार पातळीवरील उदासिनता यामुळे ही टाऊनशिप झाली नाही. आजही जळगाव एमआयडीसीमधील उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. येथे नवीन उद्योगांना जागा मिळत नाही. एमआयडीसी (MIDC) तील सर्व भूखंड आरक्षित केले आहेत. त्यातील बहुतांश उद्योग बंद पडले आहेत. काही भूखंडांवर उद्योगच सुरू करण्यात आले नाहीत. अजूनही उद्योजकांना मंजूर झालेले प्लॉट मिळालेले नाहीत. पोषक वातावरण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे जळगाव एमआयडीसीचा विकास रखडला आहे. जळगावमध्ये उद्योग नसल्याने रोजगार नाहीत. परिणामी येथील हजारो तरुणांनी नोकरीच्या शोधात घरदार सोडून पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या शहरांची वाट धरतात.

नव्या एमआयडीसी (MIDC) च्या प्रस्तावाबाबत बोलतांना उद्योजक तथा लघु उद्योग भारतीचे नाशिक विभागाचे सचिव समीर साने म्हणाले की, जळगावसाठी १०० बेड चे ईएसआयसीचे हॉस्पीटल मंजूर झाले आहे. मात्र सध्याच्या एमआयडीसीकडे जागा शिल्लक नाही. नव्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध मिळू शकते. तसेच एमएसईबीचे (MSEB) चार नवीन सबस्टेशन मंजूर झाले आहेत त्यासाठीही जागा नाही. यासाठी आताच्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यामुळे नव्या एमआयडीसीचे स्वागतच आहे. मात्र सध्यस्थितीत कार्यरत उद्योगांच्या अडचणींकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.