विधवा वहिनीला लग्न करून दिराने दिला आधार !

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । अचानक हृद्यविकाराच्या झटक्याने भाऊचे निधन झाले. मात्र आपल्या विधवा वहिनीला लग्न करून आधार देणाऱ्या राहुल विनोद काटे (वय-३१) असं या दिराचं संपूर्ण समाजात कौतुक होत आहे. अनिता काटे (वय-२८) या विधवा वहिनीसोबत राहुलने लग्न केले आहे.

गेल्या वर्षी कुटुंबाचा आधारवड असलेला शेतकरी संभाजी काटे याचे हृदयविकाराने निधन झाले. ज्यावेळी संभाजीचे निधन झाले त्याच्या पश्चात विद्या व वैभवी या जुळ्या मुली तर पत्नी अनिता या सात महिन्याच्या गर्भवती होत्या. जन्म होण्यापूर्वीच बाळाच्या पित्याला क्रूर काळाने हिरावून नेले होते.

या कठीण काळात लहान दीर राहुलने परिवाराला धीर दिला. त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी अनिता यांनी ‘मयंक’ या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कमी वयात विधवा झालेल्या वहिनीचे आणि भाऊच्या लहान मुलांचं दु:ख राहुलकडून पाहवत नव्हतं. त्यामुळे त्याने वहिनीसोबत लग्नगाठ बांधून तिला व तिच्या मुलांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या कार्याचे कौतुक होत आहे.