जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२५ । एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून मात्र यातच नेते पदाधिकारी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसून येत आहे. अशातच आता जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत अनेक वर्ष काम करणारे माजी आमदार भाजपमध्ये दाखल होणार आहे. यासंदर्भात त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट झाली.

पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ (Dilip Wagh) आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव येथील कार्यक्रमात माजी आमदार दिलीप वाघ यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
माजी आमदार दिलीप वाघ आणि त्यांचे परिवाराचे अनेक वर्षांपासून शरद पवारांसह अजित पवारांसोबत राजकीय संबंध आहेत. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते पक्षावर नाराज आहेत. यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिली.
येत्या काही दिवसांमध्ये मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिलीप वाघ यांचा भव्य प्रवेश सोहळा होणार असून माजी आमदार दिलीप वाघ यांचे बंधू संजय वाघ देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.