⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

धिंगाणा : हॉटेलमध्ये गोंधळ, बाहेर पोलिसांशी वाद, तरुण-तरुणींविरुद्ध दोन गुन्हे दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या हॉटेल गोल्डन नेस्टमध्ये वाढदिवसाची पार्टी करीत असलेल्या तरुण तरुणींनी मद्यपान करून गोंधळ घातला. पोलिसांनी एकदा सूचना केल्यावर काही वेळाने हॉटेलबाहेर एका तरुणाने पोलिसांशी वाद घातला. झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला तर पोलिसांनी एकाला पकडले असता पोलीस वाहनातून पळ काढत त्याने धूम ठोकली. पळणाऱ्याला पकडण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार दोन पोलिसांची दुचाकी घसरली. मध्यरात्रीनंतर सुरु असलेल्या या नाट्यमय धिंगाणाबाबत रामानंदनगर पोलिसात तरुण-तरुणींविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जैनाबाद परिसरात राहणाऱ्या सागर कोळी या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही तरुण तरुणी शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता डी मार्टजवळ असलेल्या हॉटेल गोल्डन नेस्ट येथे गेलेले होते. रात्री १२.३० वाजेची वेळ झाल्यामुळे वेटर कुणाल व कॅप्टन सम्राट यांनी बिअर देण्यास आणि त्याठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई केली. यावेळी एकाने टेबलावर काचेचे ग्लास देखील फोडले. हॉटेलच्या व्यवस्थापकाने देखील त्यांना समजावले. वाद वाढल्याने काही तरुण तरुणी हॉटेलच्या बाहेर गेले. नेमके त्याच वेळी आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी समज देत जेवण करून शांततेत घरी जाण्याचा सल्ला दिला.

जेवणावरून हॉटेलमध्ये वाद सुरु असताना हॉटेलच्या बाहेर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शासकीय वाहनासह पोहचले. पोलिसांसोबत एका तरुणाची बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. वादात आपल्या गळ्यातील चेन पडल्याचे तो तरुण सांगू लागला. हॉटेलबाहेर मोठा जमाव जमल्याने आणि वाद वाढत असल्याने पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेत वाहनात बसविले. त्यातच पोलीस कर्मचारी राजेश भावसार यांच्या हाताला काहीतरी धारदार वस्तू लागल्याने रक्त वाहू लागले. पोलीस त्याकडे पाहत असताना पोलीस वाहनातून उतरून तरुणाने धूम ठोकली.

दोन पोलीस कर्मचारी दुचाकीने त्याचा पाठलाग करण्यासाठी जात असतानाच त्यांची दुचाकी घसरली. तोवर एका रिक्षाला हात देत त्यात बसून तरुणाने पळ काढला. सर्व गोंधळ सुरु असताना शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे हे देखील पथकासह पोहचले. एका चारचाकीचा पाठलाग करीत त्यांनी दोघांना थांबविले. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याने देखील एक तरुणाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने पळ काढला. मध्यरात्री सुरु झालेला हा गोंधळ रात्री उशिरापर्यंत सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी रात्री जितेंद्र आत्माराम जाधव वय-२२, रा.आशाबाबा नगर याला ताब्यात घेतले होते.

गोंधळ आणि झटापटप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने रामानंद नगर पोलिसात पोलीस कर्मचारी राजेश भावसार यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र आत्माराम जाधव, प्रवीण सोनार, गणेश रवींद्र साोनवणे, सागर सुधाकर कोळी (दोघे रा. जैनाबाद), सपना सागर कोळी, अण्णा राठोड, राम सोनवणे, पूजा प्रवीण अहिरे व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हॉटेल मालक राजकुमार रावलानी यांनी स्वतंत्र फिर्याद दिल्याने वेगळा गुन्हा दाखल झाला आहे.