⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

भाजपची आज महत्त्वाची बैठक ; देवेंद्र फडणवीस करणार मोठी घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । शिंदे गटाच्या बंडखोरीने संकटात आलेली महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळलं. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपची आज एक महत्त्वाची बैठक होणार असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस आणि एकनाथ शिंदे पुढील रणनिती तयार करणार आहेत. भाजपने कालच सर्व आमदारांना मुंबईत येण्यास सांगितले होते. भाजप सरकार स्थापन करण्याचे संकेत भाजपने बुधवारी रात्री सोशल मीडियातून दिले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र भाजपने ट्वीट केले आहे. यात मी पुन्हा येईन ….. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी! जय महाराष्ट्र असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

दुसऱ्या बाजूला स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन करत असतानाचा फोटो शेअर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस स्वत: गुरुवारी सकाळी पुढील रणनीती कशी असेल याबाबत माहिती देणार आहेत. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यात दाखल झाले आहेत.

ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई भाजपने देखील ट्वीट केले होते. ये तो सिर्फ झांकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है, असे त्यांनी म्हटले आहे. या दोन्ही ट्वीटवरून आता हे स्पष्ट आहे की राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर आता भाजपचे लक्ष्य मुंबई महानगरपालिका असणार आहे.