जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्या विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगावात येणार आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून भाजपचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत असतानाच सोमवारी फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यात भाजपला गळती लागली असून जळगाव मनपातील ३० तर मुक्ताईनगर येथील पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना भाजपचा मित्र पक्ष समजला जात असला तरी सध्या त्यांचा घरोबा वेगवेगळा आहे तर दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादी सोबत मिळून राज्यात सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून दावा केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मनपातील सात नगरसेवक शिवसेना प्रवेशाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. मंगळवारी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्हा दौर्यावर आहेत तत्पूर्वी सोमवारी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याने जळगाव दौऱ्याचं कनेक्शन त्यांच्या भेटीशी जोडले जात आहे. शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप कुठलीही माहिती समोर आली नसली तरी राजकारणात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.