जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । राज्यात मागील दोन महिन्यापासून आटोक्यात असलेला कोरोनाने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसापासून राज्यात दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. दरम्यान, अशातच एक मोठी बातमी समोर येतेय. माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार करत असून, माझ्या जे कोणी संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आपल्या सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.
दरम्यान, काल महाराष्ट्रात कोरोनाचे 1357 नवीन रुग्ण आढळले आहेत. मोठी बाब म्हणजे राज्यात सलग तिसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. 1357 प्रकरणांपैकी 889 प्रकरणे एकट्या मुंबईत नोंदवली गेली आहेत. सध्या राज्यात कोविड-19 चे 5888 रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाने सांगितले की, आतापर्यंत 78 लाख 91 हजार 703 संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली असून 1 लाख 47 हजार 865 रुग्णांचा या साथीमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 77 लाख 37 हजार 950 लोक कोविडची लागण झाल्यानंतर बरे झाले आहेत.