⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Detection : ग्वालियरहून जळगावात आला, दिवसा पाणीपुरी विक्री केली, रात्री दुचाकी चोरल्या, एलसीबीने हेरत आवळल्या मुसक्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । जळगाव जिल्ह्यात इतर राज्यातून येऊन पोट भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मध्यप्रदेशच्या ग्वालियरहून जळगाव शहरात पोट भरण्यासाठी एक तरुण आला होता. जळगावात शहरातील चौबे शाळा चौकात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायाची लाईन चांगली लागत असतानाच तो भरकटला आणि रात्री त्याच परिसरात दुचाकी चोरी करू लागला. शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तैनात केले होते. पथकाने माहिती काढत पाणीपुरी विक्रेत्याला हेरले आणि चौकशीकामी ताब्यात घेतले. चोऱ्या करून सराईत झालेल्या चोरट्याने रात्री पोलीस कर्मचाऱ्यांचा डोळा लागताच हातकडी उघडून पळ काढला. एलसीबीच्या पथकाने त्याला पुन्हा अटक करीत पोलिसी खाक्या दाखवला. शहरातील ४ गुन्ह्यांची त्याने कबुली दिली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्यावर ग्वालियरला देखील गुन्हे दाखल असून शहरातील असंख्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात विशेषतः जळगाव शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण काही केल्या पोलिसांना रोखणे आजवर शक्य झालेले नाही. महिन्याभरात शेकडो दुचाकीचोरी होत असल्या तरी एखाद दुचाकी पुन्हा मालकाला परत मिळत असते. शहरातील दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक नेमले होते. पथकाकडून चोरट्यांचा शोध सुरु होता. जळगाव शहरातील स्व.रामलालजी चौबे शाळेच्या चौकात दिवसा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मनीष ऊर्फ मायाराम जनरलसिंग यादव (मूळ रा. ग्वालियर, ह. मु. जळगाव) याच्याबद्दल पथकाला माहिती मिळाली. पथकाला त्याच्यावर संशय असल्याने काही दिवस खबऱ्यामार्फत पाळत ठेवण्यात आली. खबऱ्याचा संशय खरा ठरल्याने मायाराम यादवला ताब्यात घेण्याचे निश्चित झाले.

संशयास्पद हालचाली असल्याने एलसीबीच्या पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख, राजेश मेंढे, संजय हिवरकर, संतोष मायकल, ईश्वर पाटील, हेमंत पाटील यांनी पाणीपुरी विक्रेता मायाराम यादव याला पाणीपुरी विक्री करीत असताना ताब्यात घेतले. एलसीबीच्या कार्यालयात चौकशीकामी आणल्यानंतर रात्र झाल्याने त्याच्या हातात हातकडी अडकवून त्याला बसवून ठेवण्यात आले. रात्री पोलिसांचा डोळा लागताच मायारामने धूम ठोकली. पोलिसांनी लागलीच सूत्रे हलवीत पुन्हा त्याच्या मुसक्या आवळल्या. एलसीबीने त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यात शहर पोलीस ठाणे, जिल्‍हापेठ आदी हद्दीतून चार दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून वाहने जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील आणि जिल्ह्यातील आणखी गुन्हे त्याच्याकडून उघड होण्याची शक्यता आहे.